तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर 

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर (जन्म : इ.स. १९३५; – इ.स. २००२) ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महिन्यात पंढरपूर येथे झाला. विठाबाईना नृत्याची आवड होती. त्यांच्या बहिणी रमाबाई व केशरबाई यांच्या मार्गदर्शनखाली विठाबाई लावणीनृत्य करण्यात तयार झाल्या. आळतेकर, मामा वरेरकर, यांच्या कलापथकात विठाबाई प्रथम नोकरी करीत होत्या.[१]

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगलाताई यांचा तमाशा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील देवदहिफळ येथे आवर्जून येतात.

सावळ्या रंगाची पण देखणा चेहरा असणारी ही नृत्यांगना आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनावर हुकमत गाजवायची,नारायणगावकरांचा अभिमान असणा-या विठाने “पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची” ही लावणी अजरामर तर केलीच पण त्याचबरोबर मुंबईची केळेवाली, रक्तात न्हाली कु-हाड असे अनेक वगनाट्य सादर करून आपल्या सुंदरतेबरोबर आपला गोड गळा,आपला नृत्याविष्कार व उत्तम अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले..पोटापेक्षा कलेसाठी नाचणारी विठा गरोदर असतानाही स्टेजवर नाचत होती, नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा येवू लागल्या, स्टेजच्या मागे असणा-या तंबूत जाऊन विठा बाळंत झाली,बाळाची नाळ दगडाने ठेचून विठा पुन्हा स्टेजवर आली, मुलगा झाल्याची बातमी देऊन पुन्हा नाचायला लागली,प्रेक्षकांनी हात जोडून सांगितले विठाबाई आराम करा,आमचे पैसे फिटले, अशी ही लोककलावंत होणे नाही…विठाच्या जीवनचरित्राची भूरळ तमाम रसिकांवर पडणे स्वाभाविकच होते, भारत चीन युद्धाच्या समयी आपल्या जवांनाना धीर येण्यासाठी युद्ध सीमेवर जाऊन त्यांच मनोरंजन करणारी विठा, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेण्यासाठी गेलेल्या विठाला गर्दीत राज कपूरचा धक्का लागतो तेव्हा “ए भाय जरा देखके चलो” म्हणून राज कपूरला ही आवाक करून सोडणारी विठा, या तमाशा पंढरीची दंतकथा बनून राहिली, मात्र अनेक पुरस्कार प्राप्त झालेली, प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर पोहचलेल्या विठाची आयुष्याची सायंकाळ उपेक्षितच राहीली.

महाराष्ट्र सरकारने २००६ मध्ये ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ सुरू केला आहे आणि तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा दरवर्षी बहाल केला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार श्रीमती कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, श्रीमती सुलोचना नलावडे, हरिभाऊ बढे, श्रीमती मंगला बनसोडे (विठाबाईंची कन्या), अंकुश खाडे, भीमा सांगवीकर, गंगाराम रेणके, श्रीमती राधाबाई खोडे, मधुकर नेराळे, लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर आणि श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना प्रदान करण्यात आला आहे. 2019- 20 या वर्षासाठी आतांबर शिरढाेणकर यांना तर 2020-21 या वर्षांसाठी संध्या माने यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

विठाबाईंच्या जीवनावर ओम भूतकर यांनी ‘विठा’ हे संगीत नाटक लिहिले आहे. या नाटकाच्या पहिल्या सादरीकरणाला फिरोदिया करंडक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला होता. झी नाट्यगौरवमध्ये सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिकही ह्या नाटकाला मिळाले होते. नाटकाचे संगीत आणि दिग्दर्शन शंतनू घुले यांचे असून व्यावसयिक रंगमंचावर हे नाटक हिंदुस्थान थिएटर कंपनी करते.

पुरस्कार

  • विठाबाईंना १९५७ आणि १९९०मये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पदके मिळाली होती.
  • विठाबाईंना संगीत नाटक अकादमी्चा पुरस्कार मिळाला होता.