तालुक्याचा इतिहास

                  जुन्नर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. जुन्‍नर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून हा तालुका प्रसिद्ध आहे.

 

                   दंडकारण्य असलेला भूभाग जेव्हा नागरी वस्तीखाली येऊ लागला, तेव्हा महाराष्ट्र नावाचा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या अस्तित्वात आला.सातवाहन राजे हे महाराष्ट्राचे पहिले राजे. साधारण इसवी सनापूर्वी ५०० सालातल्या कालखंडात महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. प्रतिष्ठान [आताचे पैठण] ही सातवाहन राजांची राजधानी आणि जीर्णनगर [आताचे जुन्नर] ही उपराजधानी होती.त्या काळी जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत असत. मग नाणे घाट मार्गे ते घाटमाथ्यावर येऊन जुन्नर मार्गे पैठणला व्यापार करत करत जात असत. तेव्हाचे कर आकारणीचे दगडी रांजण आजही नाणे घाटात आहेत. कल्याण-नाणे घाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरील जुन्नरची बाजारपेठ तेव्हापासूनच प्रसिद्ध होती..

                 हा व्यापार उदीम वाढत जावा, आपल्या प्रदेशाची अशीच भरभराट होत राहावी आणि नाणे घाट मार्गे जुन्नरच्या डोंगराळ भागातून येणाऱ्या या व्यापारीमार्गाचे संरक्षण व्हावे आणि लूटमारीपासून बचाव व्हावा म्हणून त्या त्या वेळच्या राजवटींमध्ये भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, शिंदोला, रांजण गड, कोंबडकिल्ला यासारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली.

            टिकाऊ खडकाचा प्रदेश म्हणून भारतातील सर्वात जास्त गिरिदुर्ग जुन्नरमध्ये निर्माण झाले. देशविदेशातून येणारे व्यापारी त्यांची संस्कृती पण सोबत घेऊन यायचे. जुन्नरमध्ये डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी उत्खनन करत असताना त्यांना ग्रीक लोकांची देवता “युरोस”ची मूर्ती सापडली. चिनी भांडी, जुनी नाणी, सोन्याच्या मोहरा, शिलालेख असे खूप काही या भागात सापडते. येणारे व्यापारी मुक्त हस्ताने दान करत असत.त्यामुळे जुन्नर परिसरात प्रत्येक धर्माची, धर्मपीठाची भरभराट झाली.

              भौगोलिक अनुकूलतेबरोबर राजाश्रय व लोकाश्रयही जुन्नर परिसराला मिळत गेला. आणि म्हणूनच लेण्याद्रीला बौद्ध लेणीसमूह निर्माण झाला, मानमोडी डोंगरात जैन देवी देवता अंबा अंबिकांच्या गुहा कोरल्या गेल्या. जुन्नर शहरात प्राचीन जैन मंदिर उभारले गेले.

                मध्ययुगीन काळात लेण्याद्रीच्या बौद्ध लेण्यांमध्ये गिरिजात्मक गणपतीची स्थापना झाली, पेशवे काळात जुन्‍नरजवळच्या ओझरच्या विघ्नहराचा जीर्णोद्धार झाला. जवळच्याच ओतूर येथे गुरू चैतन्य महाराजांनी वैष्णव पंथाचा ’रामकृष्ण हर” हा मंत्र संत तुकारामांना दिला. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या रेड्याला जुन्नर तालुक्यातल्या आळे गावी समाधी दिली, पिंपळगाव धरणाजवळ खुबी गावात खिरेश्वर या पांडव कालीन मंदिराची निर्मिती झाली, खिरेश्वराच्या उत्तरेला हरिश्चंद्रगडाची अभेद्य वास्तू उभी राहिली.

        १९ फेब्रुवारी १६३०मध्ये जुन्‍नरच्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीमहाराजांचा जन्म झाला.पेशवे कालीन महालक्ष्मी मंदिर उंब्रज येथे आहे.कोल्हापूर महालक्ष्मीचे ते उपपीठ मानले जाते

जुन्नरला आधी जीर्णनगर मग जुन्नेर आणि नंतर जुन्नर असे नाव बदलत गेले. जुन्नर शहरापर्यंतचा प्रदेश हा पश्चिमेकडून डोंगराळ आहे आणि पूर्वेकडील प्रदेश हा मैदानी भूभाग आहे. त्यामुळे इथल्या डोंगर कड्यात माळशेज घाट, नाणे घाट व दाऱ्या घाट आहेत.

अणे घाटातील नैसर्गिक पूल, बोरी गावात कुकडी नदीच्या पात्रात आढळणारी १४ लाख वर्ष जुनी गुंफा ही सारे जुन्नरचे भौगोलिक महत्त्वाची ठिकाणे.आहेत.

जुन्नरमध्ये माणिक डोह धरणाच्या पायथ्याला बिबट निवारा केंद्र उभारण्यात आले असून आजमितीला जवळपास ३० बिबटे वाघ त्या ठिकाणी उपचार घेत आहेत.
समुद्र सपाटीपासून २२६० फूट उंचीवर असणाऱ्या या जुन्नरच्या पठाराला वनरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांनी भारताचे आरोग्य केंद्र म्हटले आहे. इथल्या स्वच्छ आणि मोकळ्या हवेत श्वसनाचे आजार बरे होतात हे त्यांचे निरीक्षण होते. म्हणूनच ब्रिटिश काळात ते ब्रिटिशांना जुन्नरला जाऊन आराम करायचा सल्ला देत असत. त्यांनी जुन्नरमध्ये हिवरे बुद्रुक या ठिकणी १८३९ साली वनस्पती उद्यान उभारले होते.

१९९५साली जगातील सर्वात मोठी रेडिओ इलेक्ट्रॉनिक दुर्बीण जुन्नर तालुक्यात खोडद या गावी उभारण्यात आली. जवळच आर्वीचे उपग्रह भूकेंद्रही आहे.

         आंबा, केळी या फळांचे मूळ ठिकाण परदेशात इंडो-बर्मा भागात आहे, त्याचे मूळ बीज तिथे सापडते. अगदी तेच मूळ बीज माळशेज घाटातसुद्धा सापडते.

            भाजीपाला, फळफळावळ, दुध दुभते, तांदूळ, ज्वारी, द्राक्षे, डाळिंबे, ऊस आणि फुले अशी विविध प्रकारची शेती जुन्नरमध्ये केली जाते. मांडवी,पुष्पावती,काळू, कुकडी,आणि मिना या नद्यांचा याच तालुक्यात उगम होतो. जुन्‍नर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे असलेला तालुका आहे. पिंपळगाव जोगा, माणिक डोह, येडगाव, चिल्हेवाडी-पाचघर, आणि वडज ही ५ धरणे जुन्नरमध्ये आहेत, संततधार पडणाऱ्या पावसापासून ते अवर्षणग्रस्त भागापर्यतचे भूभाग जुन्नर तालुक्यामध्ये आहेत. जुन्नरमध्ये असणारी खोडदची दुर्बीण, बिबट्या चे क्षेत्र व डोंगराळ भाग यामुळे जुन्नरला आरक्षित हरीत पट्टा म्हणून घोषित केले आहे. याचा फायदा असा झाला की जुन्नर मधली मोकळी हवा अशीच शुद्ध राहिली आहे. आणि राहण्यासाठी, फिरण्यासाठी, आरामासाठी आणि पर्यटनसाठी जुन्नर हे अतिशय उपयुक्त ठिकाण बनले आहे. तसेच जुन्नरमध्ये मिळणारी मटण भाकरी आणि मसाला वडी [मासवडी] प्रसिद्ध आहेत.

        महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या “शेतकऱ्याचा आसूडमध्ये जुन्नर कोर्टाच्या निकालाचा उल्लेख आहे.

           चित्रकार सुभाष अवचट, मुक्तांगण, कवी, लेखक, विचारवंत, अनिल अवचट, मराठी बाणा’वाले अशोक हांडे, नाटक-सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे, तमाशाची लोककला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणा्ऱ्या विठाबाई नारायणगावकर ही मंडळी मूळ जुन्‍नरचीच होत. लोकशाहीर मोमीन कवठेकर[२] यांची गीते सादर करणारे संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर, “टिंग्या” चित्रपटातून कीर्ती मिळवणारे मंगेश हाडवळे, मराठी मालिका क्षेत्रात स्वतचे स्थान निर्माण करणारी नम्रता आवटे ही जुन्‍नरची आणखी प्रसिद्ध माणसे. शेखर शेटे यांचाही जन्म याच जुन्नरला झाला.

         पुण्यनगरी, मुंबई चौफेर, यशोभूमी, आपला वार्ताहर वर्तमानपत्र सह बहुभाषिक वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक स्व. मुरलीधर बाबा शिंगोटे यांचा जन्मही जुन्नर तालुक्यात झाला.