कला

                  जुन्नर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. जुन्‍नर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातील जुन्नर मधील नारायणगाव हे तमाशा पंढरी  म्हणून  प्रसिद्ध आहे.

                               १७ व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार आहे. हा कलाप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रात गोंधळ, वाघ्यामुरळी, दशावतार, बहुरूपी, वासुदेवाची गाणी, पोतराज इ. लोककलाप्रकार प्रचलित होते. या सर्व नाटयात्मक लोककलाप्रकारात आणि तमाशामध्ये तांत्रिक अंगाच्या दृष्टीने आणि वाड्.मयीन बाजूने काहीएक प्रमाणात साधर्म्य आढळते. तमाशा हा गण, गौळण, लावणी, बतावणी आणि वग अशा पाच अंगांनी समृद्ध झालेला आहे.

     तमाशाची उत्पत्ती

           भारतीय सांस्कृतिकोशा’त ‘तमाशा’ या शब्दाच्या उत्पत्तीविषयी पुढील माहिती मिळते. ‘तमाशा’ हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ ‘प्रेक्षणीय दृश्य’ असा आहे. तमाशा संस्थेच्या शिल्पकारांना असलेली ‘शाहीर’ ही संज्ञाही मूळ ‘शायर’ किंवा ‘शाहर’ या अरबी शब्दापासून बनलेली आहे. तमाशा संस्थेचे आणि तिच्या शिल्पकाराचे नाव अरबी असल्यामुळे ही संस्था मुसलमानांच्या प्रभावातून उदय पावली असावी, असा काही विद्वानांचा कयास आहे. ‘तमाशा’ परंपरेविषयीचा संदर्भ मराठी विश्वकोशातही सापडतो, तो पुढीलप्रमाणे आहे. ‘तमाशा’ हा शब्द मूळचा मराठी भाषेतील नसून तो उर्दूतून मराठीत आला आहे. १३-१४ व्या शतकात दक्षिण भारतात मुसलमानी अंमल सुरू झाल्यापासून तो मराठीत आढळतो. एकनाथांच्या एका भारुडात ‘बड़े बड़े तमाशा ‘देखें’ अशी ओळ आहे. अशी माहिती तमाशाच्या जन्माविषयी सापडते 

तमाशाचे कालमानपरत्वे स्वरुप

      तमाशाची एकंदर प्रकृती पाहिली तर असे दिसून येईल की, “१८ व्या शतकाच्या सुरुवातीला वीरांच्या विषयवासनेवर उतारा म्हणून जन्मलेला हा खेळ १९ व्या शतकाच्या सुरुवातीला भक्ती, नीति, ब्रह्मज्ञान यात आला. म्हणजे तमाशाचे हाड शूरवीरांच्या शृंगाराचे, तर मांस सात्त्विकतेचेच दिसते. हाडाचे वळण आणि मासांने दिलेला आकार यांनी प्रकृती बनते, तसे शृंगाराच्या हाडाने आणि सात्त्विकतेच्या मांसाने तमाशाचे शरीर बनले आहे. तमाशाच्या गाडीचे एक चाक शृंगाराचे तर दुसरे ब्रह्मज्ञानाचे होते. या दोन्ही चाकांना जोडणारा कणा शूरवीरांच्या पराक्रमाचा होता. ” असे नामदेव व्हटकर म्हणतात. साधारणपणे असे तमाशाचे स्वरूप आहे. तमाशाचे खरे स्वरूप जरी पेशवाईतच उत्तर पेशवाईतच उदयास आले असले तरी तो प्रकार महाराष्ट्रात पूर्वीपासूनच अस्तित्त्वात होता असे दिसते. महाराष्ट्रात अनेक तमाशा फड असून आजमितीला प्रामुख्याने रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, काळू बाळू, दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे संच अतिशय प्रसिद्ध आहेत. तमाशा हा गावोगावी भरणाऱ्या यात्रेनिमित्त आणि त्यानंतर च्या काळात कापडी तंबू/कनात बांधुन तिकीट विक्री करून सादर केला जातो. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी अनेक वगनाट्ये, लावण्या, लोकगीते, सवाल-जवाब, गण-गवळण आणि फार्स असे विविधांगी साहित्य निर्माण केले आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख तमाशा मंडळांना पुरवले.

 पुरस्कार

तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००६ पासून दरवर्षी सात दिवसांचा तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सदर महोत्सवप्रसंगी विठाबाई नारायणगाववकर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.